Thursday, February 22, 2018

चंदन: एकरी कोटींमध्ये उत्पन्न देणारे एकमेव झाड


चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे १२ ते १५ मिटर असून घेर २ ते २.५ मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा - समोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते. परंतु जस - जसे झाड मोठे होते तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो. तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण १ ते ६% असते. 

चंदनाचे मूळ हे सुरूवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक व लवचिक असते. बाजूकडील मुळे संखेने भरपूर, तंतूमय, नाजूक व मुख्य मुळाच्या खाली पसरलेली असतात. सुरुवातीस मुळांवर गाठी असतात. त्याने त्याचे परावलंबीत्व दिसून येते. 

चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी, गर्द तपकिरी व काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत व गरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियांपासून रोपे तयार केली जातात. याशिवाय बियाचा वापर उद्योगधंद्यामध्ये करतात. बियापासून ५० ते ६०% पर्यंत सुकणारे कोरडे तेल (ड्राईंग ऑईल) मिळते. ते इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी उद्योगात वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात. 
                                                     चंदनाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
रोपे तयार करणे : चंदनाचे बी लागवडीनात्णार बियांभोवती असणाऱ्या कठीण कवचास तडा देऊन कोंब बाहेर येतो. बियाचे टरफल कालांतराने पडून जाते किंवा सुकते. लहान रोपे अति सुर्यप्रकाशात व उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. त्यासाठी सावली व पाण्याची व्यवस्था करावी. 
२ वर्षापासून १० वर्षापर्यंतच्या झाडांवरील बियांपासून रोपे तयार करताना उगवणक्षमतेत कोणताही फरक आढळून येत नाही. 

गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत : गादीवाफे २ प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे १० मिटर x १ मीटर आकाराचे करून १५ सेंमी उंची ठेवावी. यामध्ये लालमाती व चाळलेली वाळू २:१ प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले ४ किलो बी पसरून घेऊन त्यावर २ सेंमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट ५०%) करावी. 

बी उगविल्यानंतर गवताचे अच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर - जानेवारीत पेरावे. 

पिशवीत रोपे लावणे : बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर २५ ते ३० दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. 
साधारणपणे ६ ते ८ आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकवी व रोपांच्या पिशव्या अधून मधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. ६ ते ८ महिन्यामध्ये रोपे २५ ते ३० सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडीयोग्य उपलब्ध होतात.
१ किलो बियापासून साधारणपणे २००० रोपे तयार होतात. 
                                                  चंदनाची पिशवीतील  रोपे 
लागवड: मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै, ऑगस्टमध्ये रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात १६' x १२' अंतरावर १.५ x १.५ x १.५ फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर ने  भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते. 
चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत 'शर्विलक' म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. यजमान झाड नसेल तर चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड २ - ३ वर्षांनी मरते. 
                                                      यजमान वृक्ष आणि चंदन 
यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा , लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, अकेशिया, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, अंकोल, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते. 

यजमान मध्यम आयुषी झाडे : यामध्ये हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, पांगारा, बकुळ, कुंचला, बारतोंडी इ. 

यजमान फळझाडे : सिताफळ, रामफळ, डाळींब आवळा, बोर. 

यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.

अभ्यासाअंती असे समजते की, यजमान वृक्ष म्हणून सुरू, करंज, शिरीष, काशिद, साग, सिसम हे वृक्ष चंदनास योग्य/उत्तम समजली गेली आहेत. तर फळझाडांमध्ये आवळा, बोर, सिताफळ, डाळींब आणि मध्यम आयुषी झाडांमध्ये शेवरी, हादगा, पांगारा, शेवगा हे वृक्ष योग्य ठरतात. 

आंतरपीक :
चंदनातील आंतरपीक 
 चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान १० फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले ४ - ५ वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी , काळमेघ, भुई रिंगणी, शतावरी, कोरपड, अशी पिके घेता येतात. 

जमीन: लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त अशी कुठलीही जमीन चंदनास मानवते, परंतु उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा ६.५ ते ८.२ असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते. चंदनाचा गाभा आणि त्यापासून निघणारे तेल हे एक आर्थिककदृष्ट्या महत्त्वाचे उत्पादन आहे. अभ्यासाअंती असे लक्षात येते की खडकाळ, दगडयुक्त व कोरड्या भागातील चंदनापासून मिळणारे तेलाचे प्रमाण हे सुपीक जमिनीपासून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलापेक्षा अधिक असते. परंतु दोन्ही प्रकारच्या जमिनीतून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलाची गुणवत्ता सारखीच आढळते. 

हवामान : चंदनाने झाड हे ६०० ते १६०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व १२ डी ते ४५ डी. से. तापमानात चांगले वाढते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते. 

पाणी: चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून २ ते ३ वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून २ वेळा पाणी ठिबकने द्यावे. 

चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून २ वेळा तरी पाणी द्यावे.

रोग कीड : चंदनावर शक्यतो नुकसानकारक जैविक अथवा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आढळत नाही. परंतु जंगलातील जुनाट झाडांवर स्पाईक रोग मायक्रोप्लाझमा सदृश्य जिवाणूपासून झाल्याचा आढळून आला आहे. किडीमध्ये मुंगे हे रात्री पानांच्या कडा कुरतडत मधल्या शिरेकडे खात जातात. हे किडे पानांच्या खालच्या बाजूस अथवा पानाच्या गुंडाळीत अथवा जाळे बनवलेल्या पानात दिवसा आढळतात. त्याचबरोबर रस शोषणारी अळी, खोडपोखरणारी अळी, वाळवी या किडींचा प्रादुर्भाव चंदनावर आढळून येतो.  प्रादुर्भाव झाल्यावर नुकसानीची पातळी ओलांडण्यापुर्वी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. मात्र सतत रासायनिक किटकनाशकाचा वापर शक्यतो टाळावा. म्हणजे त्याचा चंदनाच्या गाभा व तेलच्या दर्जावर परिणाम होणार नाही. 

चंदनाचा गाभा : चंदनापासून सुगंधी गाभा व त्यापासून तेल मिळते. सुगंधी गाभा हा तुरट, कडू, ताप निवारक, थंड, उल्हासित, कडक, जड, टिकाऊ, मधुर आणी तिव्र वासाचे, दोष विरहीत पिवळसर अथवा तपकिरी रंगाचे, सरळ घट्ट दाणेदार व एक साच्याचे तंतुमय तेलकट गाठी विरहीत असतो. फिक्या रंगाच्या गाभ्यामध्ये गडद रंगाच्या गाभ्यापेक्षा तेलाचे प्रमाण जास्त असते. चंदन तेलाचे प्रमाण १० वर्षापेक्षा जास्त वयाच्या झाडात ०.२ ते २%, तर परिपक्व झाडात २.८ ते ५.६% असते. मुळापासून शेंड्याकडे ४५% पर्यंत तेलाचे प्रमाण कमी होत जाते तर गाभ्याच्या मध्यबिंदूपासून ते बाह्य भागापर्यंत २०% पर्यंत कमी होत जाते. 

गाभा तयार होण्याचे काम ४ वर्षाच्या पुढे सुरू होते. तर नैसर्गिक रित्या ते ७ वर्षाच्या पुढे होते. १२ ते १५ वर्षात १२ ते १५ सेंमी व्यासाच्या वृक्षापासून १५ ते २५ किलो सुगंधी गाभा मिळू शकतो. 
                                                               चंदनाचा गाभा 
गाभ्यापासून तेल: गाभ्याच्या पावडरवर वाफेच्या उर्ध्व पतनाची क्रिया करून तेल काढले जाते. त्यास जगभर 'इस्ट इंडियन सँडलवूड ऑईल' या नावाने ओळखले जाते. बाह्य लाकडा पासून दुर्मिळ वस्तू, खेळणी, कॅरम गोट्या (कॉईन) बनविल्या जातात. तर ताज्या पानांपासून फिक्कट पिवळे मेण मिळते. 

उत्पन्न : चंदनाचे उत्पन्न हे झाडांची संख्या झाड विक्री पर्यंत किती राहते यावर अवलंबून आहे .तसेच त्यावेळी असणारा बाजारभाव देखील महत्वाचा आहे . झाडाचे वय जेवढे जास्त तेवढेच त्यापासून मिळणारे लाकडाचे प्रमाण जास्त . एका झाडापासून १५ वर्षात १५ किलो जरी लाकूड मिळाले तरी त्याचे ६००० रु  प्रती किलोने ९०००० रु होतात. एकरी संरक्षणाचा खर्च वगळता कोटींमध्ये उत्पन्न आपल्याला मिळू शकते 
चंदन झाडांना संरक्षणसाठी तारेचे कुंपण 

No comments:

Post a Comment

सीताफळाची आदर्श लागवड आणि व्यवस्थापन असे करावे

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. ...